अहमदनगर - मी काका राज ठाकरेंकडून नव्हेतर आजोबा आणि वडिलांकडून सर्व धडे घेतले आहेत. त्यामुळे मला घेतलेले काम धरसोड न करता प्रामाणिकपणे पूर्ण करायला आवडते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा सुरू आहे. शेतकरी, विद्यार्थी अशा विविध सामाजिक घटकांशी ते बोलत आहेत. जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी अहमदनगरमधील माऊली सभागृहात महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. यावेळी 'काका राज ठाकरे यांच्याकडून तुम्ही राजकारणातील कोणता धडा घेतला?' असा प्रश्न एका तरुणाने विचारला. त्यावेळी त्या तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य बोलत होते.
मी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फिरत आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हा माझा प्राधान्यक्रम आहे. बाकीच्या कुठल्या पदाबाबत मला स्वारस्य नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले? मुख्यमंत्री काय बोलले? याबाबतच्या बातम्या मी टीव्हीवर बघितल्या नाही. त्यामुळे त्यावर बोलणे उचित नसल्याचे आदित्य म्हणाले.
माझ्यावर प्रेम असणारे लोक मुख्यमंत्रीपदाबाबत बोलत आहेत -
मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचाबाबत आदित्य यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले मुख्यमंत्रीपदाचा विषय माझ्यासमोर नाही. मी फक्त महाराष्ट्र घडवायला निघालो आहे. मात्र, माझ्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणाऱ्या लोकांचे माझ्यावर विशेष प्रेम असल्याचे आदित्य म्हणाले.