अहमदनगर - कोपरगाव येथील नगर मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावरून एका अज्ञात 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने उडी मारल्याची ( Girl student jumped into Godavari river ) खळबळजनक घटना घडली आहे. साधारण तीन साडेतीन वाजेच्या सुमारास विद्यार्थिनीने उडी घेतल्याचे सांगीतले जाते. पोलिसांना सूचना दिल्यांनतर तरुणीचे शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. गेल्या दिड तासांपासून खोल पाण्यात शोध सुरू असून अद्याप शोध लागलेला नाही.
हेही वाचा - Koprgaon Youth Murder : कोपरगावमध्ये बाजारात भर दिवसा युवकाची हत्या
मुलीने उडी घेतल्याचे महामार्गावरून दुचाकीवरून जात असलेल्या संदीप खिरे या तरुणाने बघितले व तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले. कोपरगाव शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. नदी पात्रात पोलीस कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी खिरे यांनी तरुणीचा शोध घेतला. मात्र, अद्याप तरुणी सापडली नाही. स्थानिक पोहणाऱ्या व मच्छिमार करणाऱ्या नागरिकांच्या सहायाने शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून, तेथे अग्निशामक दल हजर झाले आहे. तरुणीने नदीत उडी मारण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.