अहमदनगर - जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा कोरोनाचे नऊ रूग्ण आढळले. यातील आठजण नगर शहरातील वाघ गल्ली व नालेगाव येथील आहे तर एक जण संगमनेर तालुक्यातील कुरणचा रहिवासी आहे. आज दिवसभरात कोरोनाचे एकूण सतरा रूग्ण आढळले आहे तर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरातील तोफखाना, नालेगाव, वाघगल्ली, सिध्दार्थनगर, चितळे रोड हा भाग जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. जिल्ह्यातील सर्व बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी याबाबत माहिती दिली.
नगर शहरातील वाघ गल्ली येथील एक महिला, दोन पुरुष तसेच एक १८ वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळले. हे सर्वजण एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते.
आज दिवसभरात सापडलेल्या रुग्णांमध्ये सुपा ५६ वर्षीय महिला, चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवक, संगमनेरच्या मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला, श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला, पारनेरच्या खडकवाडी येथील पुरुष, दरेवाडी (नगर) येथील पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यातील खडकवाडी आणि दरेवाडी येथील दोघे रूग्ण मुंबई पोलीस दलात कार्यरत असून दोघे सोबतच नगरला आले होते.