अहमदनगर- शिर्डी जवळील पिंपळवाडी परिसरातील वीट भट्टींवर उत्तर प्रदेशातील मजूर काम करतात. या मजुरांना व त्यांच्या कुटुबीयांना आज शिर्डीहून उत्तर प्रदेशातील लखमीपूर येथे एका विशेष ट्रेनने रवाना करण्यात आले आहे. ट्रेनमध्ये १२५१ मजूर सवार होते. सर्व मजुरांना साई संस्थानच्या वतीने फूड पॅकेट्सचे वितरण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी उतरप्रदेश येथून अनेक मजूर आपल्या कुटुंबियांसमवेत राहाता तालुक्यातील पिंपळवाडी, राहाता, पुनताबा तसेच अन्य गावातील वीट भट्टींवर काम करतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यातील उद्योग बंद झालेत. त्यामुळे, हातावर पोट असलेल्या या मजुरांसमोर उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला. मजुराना त्यांच्या गावी पाठविण्यापूर्वी शिर्डी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वांची वैदकीय तपासणी कण्यात आली. यावेळी साई संस्थानच्या वतीने सर्व मजुरांना फूड पाकिटे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मजुरांची घर वापसी होत असल्याने पोलीस महसूल प्रशासनाच्या वतीने साईबाबांच्या नावे घोषणा देत टाळ्या वाजवत घर वापसी करण्यात आली. राहाता तालुक्यातील अनेक वीट भट्टींवर अजूनही काही मजूर रहिलेले असल्याने त्यांना येत्या काही दिवसात घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा- कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव तालुक्यात 95 रेशन दुकानदारांचे राजीनामे