अहमदनगर- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन महाराष्ट्रव्यापी होणार असून अहमदनगर येथे २७,२८,२९,आणि ३० एप्रिलला जिल्ह्यातील चार तालुक्यात नाट्य जागर, तर १, २ आणि ३ मे या दरम्यान मुख्य नाट्यसंमेलन अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी दिली.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार आणि ज्येष्ठ नाटककार दिग्दर्शक जब्बार पटेल हे संमेलनाध्यक्षपदी असणार आहेत, असे कांबळी व पोंक्षे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील तालुकास्तरावर चार व्यावसायिक नाटके सादर करून नाट्य जागर उपक्रम राबविण्यात येणार आहे. एक व्यावसायिक नाटक नगरमधील मुख्य कार्यक्रमात ठेवण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय नृत्य, लोककला, संगीत, नाट्यदिंडी यासह विविध कलांचे सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके, नियामक मंडळ सदस्य दिगंबर प्रभू, अशोक नारकर, सतीश शिंगटे, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, प्रवक्ते संजय घुगे संमेलन समन्वय क्षिति झावरे, अहमदनगर शाखेचे उपाध्यक्ष शशिकांत नजान, श्याम शिंदे आदी उपस्थित होते.