टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा 5-4 ने पराभव करत कांस्य पदक जिंकलं. या विजयासह भारतीय संघाने 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. या कामगिरीनंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
रामनाथ कोविंद
भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकलं. त्यांचे अभिनंदन. संघाने कौशल्य, दृढ संकल्प दाखवत ही कामगिरी केली. हा ऐतिहासिक विजय हॉकीच्या नव्या युगाचा आरंभ करेल आणि युवांना खेळामध्ये पुढे येण्यास प्रेरणा देईल, अशा आशयाचे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केलं. प्रफुल्लित भारत, प्रेरित भारत आणि गर्वित भारत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाने शानदार विजय मिळवला. ही बाब संपूर्ण देशासाठी गौरवाची आहे. हा आत्मविश्वासाने भरलेला नवा भारत आहे. पुन्हा एकदा हॉकी संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा, असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अनुराग ठाकूर
मुलांनो तुम्ही करून दाखवलं. आपल्या हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये आपला दबदबा बनवला. आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
अजित पवार
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं दैदिप्यमान कामगिरीच्या बळावर कांस्य पदक जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचं मनःपूर्वक अभिनंदन. हॉकी खेळात तब्बल ४१ वर्षांनंतर भारताला पदकाची कमाई करता आली, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अतिशय विशेष आणि अभिमानास्पद आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : पुरूष हॉकी संघाने 41 वर्षांनंतर जिंकलं पदक, जर्मनीला नमवत 'कांस्य'वर केला कब्जा
हेही वाचा - Tokyo Olympics: भारताला धक्का, विनेश फोगाटचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव