लंडन - स्पेनचा स्टार टेनिस खेळाडू राफेल नदालने विम्बल्डन स्पर्धमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने आज सोमवारी पुर्तूगालच्या जोअओ सोऊसाचा पराभव करत अंतिम आठमध्ये जागा फिक्स केली. तर महिला गटात सेरेना विल्यम्सनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
एक तास ४५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात नदालने सोऊसाचा ६-२, ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्याची लढत अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि टेनी सेंडग्रेन यांच्यामध्ये जिंकणाऱ्या खेळाडूशी होईल.
नदालने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याने पहिला सेट जिंकल्यानंतर तोच धडाका कायम ठेवत दुसरा आणि तिसरा सेट आरामात जिंकला. त्याने साऊसाचाला सामन्यात परतण्याची संधी दिली नाही.
सेरेनाने स्पेनच्या ३० वर्षीय कार्ला सुआरेज नवारों हिचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.