न्यूयॉर्क - बेलारूसची टेनिसस्टार व्हिक्टोरिया अझारेंकाने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तर, चौथ्या मानांकित जपानच्या नाओमी ओसाकाने दुसर्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीचा पराभव करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी १३ सप्टेंबरला ओसाका आणि अझारेंका विजेतेपदाच्या लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
गुरुवारी खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीत अझारेंकाने सेरेनाचा १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. हा सामना ५५ मिनिटे रंगला होता. अझारेंकाने तिसऱ्यांदा यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली आहे.
मार्च २०१६ पासून अझारेंकाचा सेरेना विरुद्धचा हा पहिला विजय आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीतील पाचवा विजय आहे. त्याचवेळी, यूएस ओपनमधील तिचा सेरेना विरुद्धचा हा पहिला विजय आहे. अझारेंकाने आपला सलग अकरावा विजय नोंदवल्यानंतर सात वर्षानंतर यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझारेंकाने नुकतेच वेस्टर्न आणि सदर्न ओपनचे जेतेपदही जिंकले आहे.
२०१२ आणि २०१३ यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात अझारेंका आणि सेरेनाने एकमेकांविरूद्ध सामने खेळले होते. या दोन्ही सामन्यात सेरेना वरचढ ठरली होती. मात्र, यंदा अझारेंकाने पारडे झुकवत सेरेनाचे २४व्या ग्रँडस्लॅम विजयाचे स्वप्न धूळीस मिळवले आहे.
तर, दुसरीकडे ओसाकाने ब्रॅडीचा ७-६ (७-१) ३-६, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना जिंकण्यासाठी ओसाकाला ब्रॅडीविरूद्ध बराच घाम गाळावा लागला आहे. ओसाकाचा यंदाचा हा सलग दहावा विजय आहे.२२ वर्षीय ओसाकाने गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. ओसाकाने यापूर्वी २०१८ मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी ती अवघ्या २० वर्षांची होती. त्याशिवाय मागील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जेतेपदही तिने जिंकले.