कराची - भारताने आगामी डेव्हिस चषक स्पर्धा पाकिस्तानातून हलवण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाला (आयटीएफ) ही मागणी भारताने केली असून ही स्पर्धा दुसरीकडे आयोजित करण्याचा आग्रहसुद्धा भारताने केला आहे.
कलम ३७० च्या मुद्द्यावर दोन्ही देशांच्या उफाळलेल्या वादामुळे भारताने हा आग्रह केला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारत तब्बल ५५ वर्षानंतर हा दौरा करणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघाचे (एआयटीए) अध्यक्ष प्रवीण महाजन म्हणाले, 'आम्ही या स्पर्धेसाठी दुसऱ्या स्थानाची मागणी केली आहे. कारण, आता स्थिती तणावपूर्ण आहे. सध्यस्थिती पाहता ही योग्य मागणी आहे.
दोन्ही देशांच्या तणावपूर्ण स्थितीमध्येही एआयटीएने आपला एक संघ पाकिस्तानात पाठवण्याची तयारी दर्शवली होती. दुसरीकडे, पाकिस्तानच्या टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफल्लाह खान यांनी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या निर्णयाचे स्वागत करण्याचे ठरवले आहे.
भारतीय टेनिस संघाने यापूर्वी, १९६४ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यांनी यजमान संघाला ४-० ने मात दिली होती. पाकिस्तानने २००६ मध्ये मुंबईचा दौरा केला होता. तेव्हा त्यांना २-३ ने पराभव स्विकारावा लागला होता.