नवी दिल्ली - स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदालने सध्या सुरु असलेल्या यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो स्वात्झमनचा ६-४, ७-५, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
हेही वाचा - केवळ दोन सामने खेळून निवृत्ती घेणारा अजब आंतरराष्ट्रीय खेळाडू...!
या सामन्यात नदालने सुरुवातीला चांगली पकड घेतली होती. त्याने स्वात्झमनची दोनदा सर्व्हिस मोडली. नदाल हा सामना सहज खिशात घालणार असे दिसत असताना स्वात्झमनने आपली कला दाखवण्यास सुरुवात केली. त्याने दमदार पुनरागमन करत नदालची सर्व्हिस दोनदा मोडत या सेटमध्ये ४-४ अशी बरोबरी केली. परंतु, नदालने यानंतरचे दोन गेम जिंकत पहिला सेट ६-४ असा जिंकला.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्येही स्वात्झमनने नदालला चांगली झुंज दिली. मात्र योग्य वेळी नदालने खेळ उंचावला आणि दुसरा सेट ७-५ तर तिसरा सेट ६-२ असा जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या सीडेड नदालने आत्तापर्यंत १८ वेळा ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली आहे. अव्वल मानांकित जोकोविच आणि फेडरर स्पर्धेबाहेर गेल्यामुळे नदालला ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी असणार आहे.