मेलबर्न - ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या आठव्या दिवशी अनेक उलटफेर पाहायला मिळाले. जगातील अव्वल खेळाडू राफेल नदालने आज (सोमवार) खेळवण्यात आलेल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. नदालने ऑस्ट्रेलियाचा खेळाडू निक किर्गियोस याला रोमांचक सामन्यात ६-३, ३-६, ७-६ (६), ७-६ (४) अशी धूळ चारली.
वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अशी ओळख असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत, नदालचा चौथ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस याच्याशी सामना झाला. नदाल-निक यांच्यात रंगलेल्या लढतीत नदालने ६-३, ३-६, ७-६ (६), ७-६ (४) अशी बाजी मारली. तीन तास रंगलेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी नदालने चांगला खेळ करत संघर्षपूर्ण विजय मिळवला.
नदालने पहिला सेट आरामात ६-३ ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये निकने पलटवार करत ६-३ अशी बाजी मारली आणि सामना बरोबरीत आणला. तिसरा सेट संघर्षपूर्ण ठरला. दोनही खेळाडूंनी चांगला खेळ केला. मात्र, नदालने हा सेट ७-६ ने जिंकला. अखेरच्या निर्णायक सेटमध्ये दोनही खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पण अखेर नदालने अनुभव आणि वेगवान सर्विसच्या जोरावर निर्णायक सेट ७-६ ने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली. राफेल नदालचा सामना आता उपांत्यपूर्व फेरीत डोमिनिक थिएम यांच्याशी होणार आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडररने गाठली उपांत्यपूर्व फेरी
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : लिएंडर पेस दुसऱ्या फेरीत