न्यूयॉर्क - यंदाच्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम आणि जर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेव एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत थीमने डॅनियल मेदवेदेवला तर, ज्वेरेवने पाब्लो कॅरेनो बुस्टाला हरवत अंतिम फेरी गाठली.
आर्थर एश स्टेडियमवर तीन तास रंगलेल्या सामन्यात दुसर्या मानांकित थीमने मागील वर्षीचा उपविजेता मेदवेदेवचा ६-२, ७-६ (७), ७-६ (५) असा पराभव केला. सामना जिंकल्यानंतर थीम म्हणाला, "पहिल्या सेटनंतर पुढील दोन सेट सोपे गेले. सेट संपल्यानंतर मी उत्कृष्ट टेनिस खेळलो आणि दोन्ही टायब्रेकर अप्रतिम होते. टायब्रेकर मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. खरे सांगायचे तर मला टायब्रेकर आवडत नाही."
तत्पूर्वी, ३० मिनिटे रंगलेल्या सामन्यात ज्वेरेवने बुस्टाला ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ असे हरवले. ज्वेरेव सामन्यानंतर म्हणाला, "मी दोन सेट मागे असलो तरी मी त्यासाठी तयारी केली होती. आज मी खूप मेहनत केली. शेवटी मी या सामन्यात विजेता झालो. "
यूएस ओपनचा अंतिम सामना १३ सप्टेंबर म्हणजेच रविवारी रंगणार आहे.