नूर सुल्तान (कझाकिस्तान) - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत गुरुवारी भारतीय कुस्तीपटूंनी चांगली कामगिरी केली. बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात, तर रवि कुमार दाहिया याने ५७ किलो वजनी गटात स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीच्या कामगिरीसह दोघांनी २०२० मध्ये टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली आहे. दरम्यान, यापूर्वी बुधवारी भारताची विनेश फोगटने ऑलिम्पिकचे तिकिट पक्के केले आहे.
नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत पोलंडच्या बेंकोवस्कीचा ९-२ ने पराभव केला. दुसऱ्या फेरीत स्लोवकियाच्या डेव्हिडला त्याने ३-० ने धूळ चारली. तिसऱ्या फेरीत कोरियाच्या जॉग सूगला ८-१ ने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि ऑलिंपिकसाठी पात्र ठरला. उपांत्य फेरीत बजरंगचा सामना कझाकिस्तानच्या दौलत नियाजबकोव याच्याशी होणार आहे.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटची 'कांस्य' पदकावर मोहर, ऑलिम्पिकचे तिकीट पक्के
विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये रवी कुमारने ५७ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत कोरियाच्या किमला ११-० ने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत आर्मेनियाच्या अरसेनचा १७-६ असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत जपानच्या युकी ताकाहाशीचा ६-१ असा पराभव करत त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि याचसह तो ऑलिंपिकसाठीही पात्र ठरला. उपांत्य फेरीत रवि कुमारला गतविजेता झौर युगूएव्ह याचा सामना करावा लागणार आहे.