टोकियो - गोल्डन गर्ल अवनी लेखरा टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारतीय संघाचे ध्वजवाहक असणार आहे. टोकियो पॅराऑलिम्पिकचा समारोप सोहळा उद्या रविवारी पार पडणार आहे. दरम्यान, या पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे.
अवनी लेखरा ही, एका पॅराऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी भारताची पहिली महिला अॅथलिट आहे. तिला समारोप सोहळ्यात भारतीय संघाच्या ध्वजवाहकाचा मान मिळाला आहे. उद्धाटन सोहळ्यात टेक चंद भारतीय संघाचा ध्वजवाहक होता.
अवनी लेखराने सुवर्ण आणि कास्य पदक जिंकले -
19 वर्षीय अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर रायफल एसएच 1 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. यानंतर ती 50 मीटर एअर रायफल एसएच1 गटात कास्य पदकाची मानकरी ठरली. भारतीय पॅरा अॅथलिटनीं टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी यंदा सर्वाधिक पदक जिंकली आहेत.
54 सदस्यीय भारतीय संघ
भारताने 54 सदस्यीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकमधील 9 खेळात भाग घेण्यासाठी पाठवला होता. यात तिरंदाजी, अॅथलेटिक्स (ट्रॅक अँण्ड फिल्ड ), बॅडमिंटन, जलतरण, वेटलिफ्टिंगसह इतर खेळाचा समावेश आहे.
पदक तालिकेत भारताचा डंका -
भारतीय पॅरा अॅथलिटनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण 17 पदके जिंकली. यात 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कास्य पदकाचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.
5 सप्टेंबर रोजी टोकियो पॅराऑलिम्पिकचा समारोप सोहळा -
टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळा उद्या रविवारी (5 सप्टेंबर) रंगणार आहे. दुसरीकडे अखेरच्या दिवशी भारताच्या अनेक अॅथलिटचे पदकासाठी सामने होणार आहेत.
हेही वाचा - Tokyo Paralympics: जय हो! प्रमोद भगतने जिंकलं सुवर्ण पदक, मनोज सरकार कास्य पदकाचा मानकरी
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताचा पदकतालिकेत डंका, पॅराऑलिम्पिकमधील सर्वोत्कृष्ठ कामगिरी