नवी दिल्ली - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिक हिला शुक्रवारी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी रुयकेकडून साक्षीला २-० असा पराभवचा सामना करावा लागला. तर, विनेश फोगट, अंशू मलिक आणि गुरशरण प्रीत कौर यांनी कांस्यपदके पटकावली आहेत.
हेही वाचा - पीएसएलमध्ये चालू सामन्यादरम्यान फिक्सिंग?
उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगाटचा पराभव झाला. ५३ किलो वजनी गटात जपानच्या मायु मुकाइदाने विनेशचा पराभव केला. ५७ किलो वजनी गटात अंशू मलिकला जपानच्या रिसाको कवाईने मात दिली. तर, गुरशरण सिंगने मंगोलियाच्या सेवेगमेड इंखबायारचा ५-२ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
भारताच्या खात्यावर आता चार सुवर्ण, दोन रौप्य आणि सात कांस्य अशी एकूण १३ पदके जमा आहेत. यापैकी भारतीय महिलांनी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण आठ पदके मिळवली आहे. गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.