नवी दिल्ली : भारतीय संघासाठी दिवस ठरला आहे, वेळ ठरली आहे, मैदानही निश्चित झालेले आहे, प्रतीक्षा आहे फक्त एका विजयाची. आयसीसी ICC ट्रॉफी मिळवण्यासाठी आसुसलेल्या भारतातील १२५ कोटी जनतेला होळीपूर्वी T20 विश्वचषक जिंकून भारताच्या मुली देशाच्या क्रिकेटप्रेमींना दुहेरी आनंद देऊ शकतात. भारताचा संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. गुरुवारी, 23 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून भारताची ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा होणार आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर होणार आहे. पाचवेळा टी-20 महिला विश्वचषक चॅम्पियन टीम ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे, भारतीय संघासाठी सोपे नाही. या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन आव्हान मोडून काढत अंतिम फेरी गाठण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे.
ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी : फायनलमध्ये पोहोचण्याचा भारताचा मार्ग सोपा नसणार आहे. भारताच्या संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचा पराभव करावा लागणार आहे. पाच वेळा T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि गट टप्प्यातील त्यांचे चारही सामने जिंकून त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टी-20 महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारताची कामगिरी चांगली झाली नाही. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 5 सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाने केवळ 2 सामने जिंकले आहेत आणि उर्वरित 3 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेले 2 विजय हे ग्रुप स्टेज मॅचेस होते. भारताच्या महिला संघाला आजपर्यंत बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेले नाही. यावेळीही उपांत्य फेरीचा सामना फक्त ऑस्ट्रेलियाचाच आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे.
T20 महिला विश्वचषकात टीम इंडियाने 5 सामने खेळले : T20 महिला विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. पहिला सामना : T-20 महिला विश्वचषक 2010 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांशी भिडले. या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला. दुसरा सामना : या T20 महिला विश्वचषक 2012-13 गट टप्प्यातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यावेळीही ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ठरला. तिसरा सामना : या T20 महिला विश्वचषक 2018-19 गट टप्प्यातील सामन्यात भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव केला. या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून ८ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळीही ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्ड चॅम्पियन संघ बनला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळले गेलेल सामने : चौथा सामना : ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या या T20 महिला विश्वचषक 2019-20 मध्ये, भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव केला. पाचवा सामना : T-20 महिला विश्वचषक 2019-20 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 85 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला. या सामन्यात 184 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि संपूर्ण संघ 99 धावांवर ऑलआऊट झाला. यावेळीही ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन ठरला.
ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे आव्हानात्मक : आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर T20 विश्वचषकाच्या एकही बाद फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवलेला नाही. भारताला 1 सेमीफायनल मॅच आणि 1 फायनल मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात आली. मात्र, टी-20 विश्वचषकात खेळल्या गेलेल्या शेवटच्या 3 पैकी 2 सामने भारताने जिंकले आहेत. या वेळेपूर्वी भारताने 3 वेळा उपांत्य फेरी गाठली आहे आणि 1 वेळा अंतिम फेरी गाठली आहे, परंतु दुर्दैवाने एकदाही T20 महिला विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारत टी-२० विश्वविजेता होण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर भारत अंतिम फेरीत विजय मिळवेल आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा भारताचा दुष्काळ संपेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे. सध्याच्या T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत करणे हे अत्यंत आव्हानात्मक लक्ष्य आहे. पण अशक्य नाही. भारताच्या मुली विजयाच्या ध्येयाने मैदानात उतरतील, जिंकतीलही.