अमरावती - एक भारत-श्रेष्ठ भारत, खेलो इंडिया आणि भारतीय मलखांब संघटनेच्या संयुक्तविद्यमाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मलखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अमरावती शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर ही तीन दिवसीय स्पर्धा रंगणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण नऊ राज्यातील मल्लखांबपटू सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे उद्घाटन अमरावतीचे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या सोहळ्याला मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रमेश इंदुलिया यांच्यासह श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डॉ. माधुरी चेंडके यांनी दिली.
हेही वाचा - विराट कोहली तब्बल ७ वर्षांनी ठरला 'गोल्डन डक'
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पश्चिम विभागातून महाराष्ट्र, हरियाणा, गोवा, तामिळनाडू, ओरिसा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा या राज्यातील स्पर्धक आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. या स्पर्धेचा समारोप शनिवारी होणार आहे. समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. माधुरी चेंडके यांनी केले.