मुंबई - टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या पुरुष आणि महिला ध्वजवाहकाची घोषणा करण्यात आली आहे. ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम आणि हॉकीपटू मनप्रीत सिंह भारतीय संघाचे ध्वजवाहक असणार आहेत, याची माहिती अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी एका आधिकारिक पत्राद्वारे दिली. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. तर याचा समारोप ८ ऑगस्ट रोजी होईल. कुस्तीपटू बजरंग पुनिया याला ८ ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिकच्या समारोह सोहळ्यावेळी ध्वजवाहकाचा मान देण्यात आला आहे.
यंदा एक नाही दोन ध्वजवाहक
ऑलम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत एक खेळाडू ध्वजवाहक म्हणून निवडला जात होता. परंतु, यंदा पहिल्यादांच भारताचे एक नाही तर दोन ध्वजवाहक असणार आहेत. नरिंदर बत्रा यांनी खेळांमध्ये लैंगिक समानता दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली. २०१६ च्या रिओ ऑलम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा याला ध्वजवाहकाचा मान देण्यात आला होता.
भारताची 'सुपरमॉम'
महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने याआधी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून दिले आहे. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देखील मेरी कोमकडून पदाकाच्या आशा आहेत. मेरी कोमने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकून दिले आहेत. तर राष्ट्रकुलची ती चॅम्पियन आहे. आशियाई चॅम्पियशीपमध्ये तिच्या नावे पाच सुवर्णपदक आहेत. यावर्षीच्या आशियाई चॅम्पियनशीपमध्ये मेरी कोम अंतिम फेरीत पोहोचली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमकडून चांगल्या कामगिरीची आपेक्षा आहे.
बजरंग पूनियावर देशाच्या आशा
कुस्तीपटू बजरंग पूनिया ६५ किलो वजनी गटातून खेळणार आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा बजरंग प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. २७ वर्षीय बजरंगने नूर सुल्तान स्पर्धेत शानदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. त्याच्याकडून देखील पदकाची आपेक्षा आहे.
हेही वाचा - IPL २०२२ Mega Auction : CSK 'या' ४ खेळाडूंना करू शकते रिटेन; सुरेश रैनाचा होणार पत्ता कट?
हेही वाचा - श्रेय्यस अय्यर उर्वरित IPL २०२१ हंगामामध्ये खेळणार, ऋषभ पंतचे कर्णधारपद जाणार?