नवी दिल्ली - महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. राहुलने निवड चाचणीत ६१ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.
आशियाई स्पर्धेसाठी सोमवारी हरियाणा येथे निवड चाचणी घेण्यात आली. यात राहुलने ६१ किलो वजनी गटाच्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात स्थान पक्के केले. तर याच प्रकारात ७० किलो वजनी गटात नवीन कुमार, ७९ किलो गटात बलियान आणि ९२ किलो गटात सोमवीर याने स्थान मिळवले.
ग्रीको रोमन प्रकारात अर्जुन (५५ किलो), सचिन राणा (६३ किलो), आदित्य कुंडू (७२ किलो), हरप्रीत सिंग (८२ किलो) यांनी आपले नाव पक्के केले. तर महिला गटात साक्षी मलिकने ६५ किलो वजनी गटात बाजी मारली. पिंकी (५५ किलो), सरिता (५९ किलो) आणि गुरशरणप्रीत कौर (७२ किलो) यांनीही स्थान मिळवलं आहे.
राहुलने पहिल्या सामन्यात दिल्लीच्या नवीन कुमारला पराभूत केले, तर अंतिम कुस्तीत हरियाणाच्या रविंद्रला ७-५ असे धूळ चारली. दरम्यान, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा दिल्ली येथे १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.