गुवाहाटी - खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने खो-खो, जलतरण, कुस्ती आणि वेटलिफ्टिंग खेळात वर्चस्व गाजवले. खो-खो मध्ये महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये अजिंक्यपद पटकावले. तर जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी रविवारी चार सुवर्णपदके पटकावली. तसेच कुस्तीत विजय पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. वेटलिफ्टिंग प्रकारातही महाराष्ट्राने दोन सुवर्णपदकं जिंकली.
खो-खो -
- खो-खो (१७ वषार्खालील) मुलांमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १९-११ असा सहज पराभव केला. मुलींच्या १७ वषाखालील गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्ली संघाला १४-८ ने मात दिली.
जलतरण -
- जलतरण स्पर्धेत मुलांच्या २१ वषार्खालील गटात मिहिर आम्ब्रेने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याने १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यत ५४.९१ सेकंदांमध्ये जिंकली. तर मुलींमध्ये अपेक्षा फर्नाडिसने १७ वषार्खालील गटात ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले शर्यत ५ मिनिटे १२.१९ सेकंद अशा विक्रमी वेळेत पार केली. तसेच केनिशा गुप्ताने १०० मीटर फ्री स्टाइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
- महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर्स मिडले रिलेमध्येही विजेतेपद पटकावले. या संघात मिहिर आम्ब्रे, सुचित पाटील, रुद्राक्ष मिश्रा आणि एरॉन फर्नाडिस यांचा समावेश आहे.
वेटलिफ्टिंग -
- वेटलिफ्टिंगमध्ये प्राजक्ता खालकरने ६४ किलो गटात, अभिषेक निपणेने ७३ किलो गटात तर किरण मराठे याने युवा गटात सुवर्णपदक पटकावले. गणेश बायकर याला याच गटात कांस्यपदक मिळाले.
हेही वाचा - बारावीत शिकणाऱ्या मुलीने कुस्तीमध्ये मुलाला केले चितपट
हेही वाचा - खेलो इंडिया युथ गेम्स २०२० : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्र 'किंग'