नवी दिल्ली - आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता भालाफेकपटू दविंदरसिंग कंगला डोपिंगप्रकरणात क्लीन चिट अपेक्षित आहे. घशात संसर्ग झाल्यामुळे त्याने औषधे घेतली होती. परंतु यापूर्वी त्याने या औषधांबद्दल माहिती दिली होती आणि म्हणूनच त्याला शिस्तभंगाच्या सुनावणीत क्लीन चिट अपेक्षित आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये कंगचा नमुना घेण्यात आला होता. तेव्हा त्याच्या नमुन्यात डेक्सामेथोसन आढळले होते. हा पदार्श वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीच्या (वाडा) बंदी घातलेल्या पदार्थांच्या यादीमध्ये आढळतो. गळा आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांसाठी याचा वापर केला जातो.
कंग म्हणाला, गेल्या वर्षी इंडियन ग्रांप्री 5 पूर्वी मला घशात संक्रमण झाले होते. मी टीम मॅनेजमेंटची परवानगी घेतली आणि मग पटियालातील एका वैयक्तिक वैद्यांशी संपर्क साधला. त्याने मला मोक्सिटस 500 आणि सोन डेक्सामेथोसन ही दोन औषधे दिली. ही औषधे डोप टेस्टच्या निकालांचे कारण आहेत. नाडाचे लोक जेव्हा नमुना घ्यायला आले, तेव्हा मी त्यांना या दोन औषधांबद्दल सांगितले. मला आशा आहे की मला डोपिंग प्रकरणी क्लीन चिट मिळेल.''
नाडा शिस्तबद्ध समितीला उत्तरे देण्यात कंग अपयशी ठरल्यास त्याला आठ वर्षांच्या बंदीचा सामना करावा लागू शकतो. कारण हे त्याचे दुसरे डोपिंग प्रकरण असेल. यापूर्वी 2018 मध्ये त्याला डोपिंगप्रकणी फटकारले होते.