नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने पहिल्या डावात 10 विकेट गमावत 657 धावा केल्या ( England Team Scored 657 Runs For 10 Wickets in First Innings ) आहेत. गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने 75 षटकांत ( England Made Record on First Day ) चार विकेट गमावून 506 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हॅरी ब्रूक्स (101) आणि बेन स्टोक्स (34) मैदानावर होते. हॅरी ब्रूकने आज आपला डाव पुढे नेत 153 धावा केल्या. बेन स्टोक्स 41 धावा करून बाद झाला. आज इंग्लंडच्या सहा फलंदाजांनी 151 धावा केल्या. त्याचवेळी पाकिस्तानने उपाहारापर्यंत १७ धावा केल्या होत्या.
इंग्लंडने पहिल्या दिवशी एक विक्रम केला : 17 वर्षांनंतर कसोटी खेळण्यासाठी पाकिस्तानात पोहोचलेल्या इंग्लंड संघाने पहिल्याच दिवशी आपले इरादे स्पष्ट केले. जॅक क्रॉलीने 111 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 122 धावा केल्या, तर सलामीवीर म्हणून इंग्लंडसाठी सर्वात जलद शतकाचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याच्यानंतर बेन डकेटने 110 चेंडूत 107 धावा केल्या. त्यांच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी करीत 35.4 षटकांत 233 धावांची भागीदारी केली. संघासाठी 3 व्या क्रमांकावर उतरलेले ओली पोप आणि 5 व्या क्रमांकावर उतरलेले हॅरी ब्रूक यांनीही शतके झळकावली. अशाप्रकारे कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या 4 फलंदाजांनी शतके झळकावली.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावांचा विक्रम : पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने ५०६ धावा केल्या आहेत. कोणत्याही कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केलेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी कोणताही संघ ५०० धावांचा आकडा गाठू शकला नव्हता. यापूर्वी 9 डिसेंबर 1910 रोजी सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावत 494 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे इंग्लंडने 112 वर्षे जुना विक्रम मोडला.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चार शतके : या सामन्यात जॅक क्रॉलीने 111 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 122 धावा केल्या, तर सलामीवीर म्हणून इंग्लंडसाठी सर्वात जलद शतकाचा विक्रमही त्याच्या नावावर झाला. त्याच्यानंतर बेन डकेटने 110 चेंडूत 107 धावा, ऑली पोपने 104 चेंडूत 108 धावा आणि हॅरी ब्रूक्सने 81 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 101 धावा केल्या. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चार शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कसोटी सामन्याच्या एका षटकात सहा चौकार : पाकिस्तानसाठी उद शकीलने ६७ वे षटक आणले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ब्रूकने मिडविकेटच्या दिशेने शानदार चौकार मारला. यानंतर पुढच्या पाच चेंडूंवरही त्याने चौकार ठोकले. ब्रूकसमोर गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होता. कसोटी सामन्याच्या एका षटकात सहा चेंडूत सहा चौकार मारण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी संदीप पाटील (1982), ख्रिस गेल (2004), रामनरेश सरवन (2006) आणि सनथ जयसूर्या (2007) यांनी ही कामगिरी केली होती.