कोची - भारताचा फुटबॉलपटू संदेश झिंगनची जर्सी नंबर 21 इंडियन सुपर लीगमधून (आयएएसएल) निवृत्त होणार आहे. केरला ब्लास्टर्सने ही माहिती दिली. झिंगनने गुरूवारी या क्लबला रामराम ठोकला. क्लबने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात निखिल भारद्वाज यांनी संदेशच्या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.
भारद्वाज म्हणाले, "आम्ही संदेश आणि त्यांच्या समर्थकांचे समर्पण, निष्ठा, उत्कटतेबद्दल आभार मानतो. क्लब नवीन आव्हान स्वीकारण्यास इच्छुक असलेल्या संदेशचा आदर करतो. आम्ही नवीन प्रवासाबद्दल त्याचे अभिनंदन करतो. तो ब्लास्टर्सचा मनापासून नेहमीच चाहता असेल. क्लबमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव करत आम्ही त्याची 21 क्रमांकाची जर्सी कायमची निवृत्त करत आहोत."
एका अहवालानुसार केरला ब्लास्टर्सला सध्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या संघातील अनेक खेळाडूंच्या मानधनातही कपात होणार आहे. त्यामुळे बरेचसे खेळाडू या निर्णयाशी सहमत नसून ते क्लब सोडण्याच्या तयारीत आहेत.
26 वर्षीय झिंगनने केरला ब्लास्टर्सचे कर्णधारपदही भूषवले आहे. या संघात राहूनच त्याची कारकीर्द उदयास आली. झिंगनने पहिल्या सत्रात क्लबसाठी 14 सामने खेळले होते. त्याने आतापर्यंत ब्लास्टर्ससाठी विक्रमी 76 सामने खेळले आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अर्जुन पुरस्कारासाठी झिंगन आणि महिला संघाची स्ट्रायकर बाला देवी यांच्या नावांची शिफारस केली आहे.