मँचेस्टर - स्पेनचा दिग्गज खेळाडू डेव्हिड सिल्वा मँचेस्टर सिटी क्लब सोडणार आहे. २०१९-२० च्या हंगामानंतर तो क्लबला 'अलविदा' करणार आहे. मूळचा स्पेनचा खेळाडू सिल्वाने सिटी क्लबकडून खेळताना आत्तापर्यंत चार इंग्लिश प्रीमीयर लीग ( ईपील), दोन एफए करंडक आणि चार लीग स्पर्धा जिंकल्या आहेत.
डेव्हिड सिल्वाला पुढील हंगाम सिटी क्लबकडून खेळणार का? असे विचारले असता, त्यावर त्याने सांगितले की, हा माझा सिटी क्लबसोबतचा शेवटचा हंगाम असणार आहे. मी मागील १० वर्षापासून सिटीकडून खेळत असून हा काळ खूप आहे आणि क्लब सोडण्याची ही योग्य वेळ असल्याचं त्याने सांगितलं.
सिटी क्लबकडून पुढील २ वर्षासाठी करार करण्याची ऑफर आली होती. मात्र मी एक वर्षाचा करार केला असल्याचे सिल्वा म्हणाला. ३३ वर्षीय सिल्वाने मागील हंगामात सिटी क्लबकडून खेळताना एकूण ३३ ईपील सामन्यांमध्ये ६ गोल केले आहेत.