मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा 18 वा सामना काल मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने दिलेले 110 धावांचे माफक लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने 9 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले.
कॅपिटल्सची धारदार गोलंदाजी : दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कॅपिटल्सची धारदार गोलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणासमोर मुंबई इंडियन्सचा संघ हतबल दिसला. मुंबई इंडियन्सचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 109 धावा करू शकला. दिल्लीकडून मारिजन कॅपने उत्कृष्ट गोलंदाजी करताना 4 षटकात 12 धावा देत 2 बळी घेतले. मारिजनने 17 डॉट बॉलही टाकले.
गुणतालिकेत दिल्ली अव्वल स्थानावर : दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने 22 चेंडूत नाबाद 32 आणि एलिस कॅप्सीने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. तर शेफाली वर्माने 15 चेंडूत 33 धावा केल्या. या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्ली 7 सामन्यात 5 विजय आणि 2 पराभवांसह 1.978 च्या नेट रन रेटने पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर मुंबई इंडियन्स 7 सामन्यात 5 विजय आणि 2 पराभवांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईचा नेट रन रेट 1.725 आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 : मुंबई इंडियन्स प्लेइंग - हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वाँग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक ; दिल्ली कॅपिटल्स - मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिजन कॅप, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, पूनम यादव