नवी दिल्ली : महिला प्रीमियर लीग 2023 सुरू झाली आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रातील सलामीच्या सामन्यात गुजरात जायंट्सला मोठा धक्का बसला. गुजरातची कर्णधार बेथ मुनीला पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना गुडघ्याचा त्रास होऊ लागला. यामुळे बेथ मुनीला मध्येच सामना सोडावा लागला. पण मुनी तंदुरुस्त होईपर्यंत संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे येईल हा प्रश्न कायम आहे. या शर्यतीत स्नेहा राणाचे नाव पुढे येत आहे. बेथ मुनीच्या अनुपस्थितीत गुजराज स्नेहा राणाला कर्णधार बनवू शकतो.
स्नेहा राणाला संघाची कर्णधार बनवण्याची शक्यता : बेथ मुनीबद्दल अशी अटकळ आहे की, तिला डब्ल्यूपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर राहावे लागेल. ती तंदुरुस्त होईपर्यंत ती परत येऊ शकणार नाही. या लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध गुजराजची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मुंबईने गुजरातला 205 धावांचे लक्ष्य दिले होते. आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी आलेली गुजरातची कर्णधार बेथ मुनीला 3 चेंडूनंतरच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. याचे कारण असे की, मूनीच्या गुडघ्यात अचानक दुखू लागले, मूनाच्या वेदना खूप वाढल्या तेव्हा ती दोन खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर गेली. आता मुनी तंदुरुस्त होईपर्यंत गुजरातची उपकर्णधार स्नेहा राणाला संघाची कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डीवाय पाटील स्टेडियमवर सामना होणार आहे : आता गुजरात जायंट्सच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. आज 5 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. डब्ल्यूपीएल लीगच्या पहिल्या सत्रात, यूपी वॉरियर्स आज होणाऱ्या सामन्याने पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर गुजरातचा हा दुसरा सामना आहे. स्नेहा राणाबद्दल सांगायचे तर, तिला मोठ्या टूर्नामेंटमध्ये कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. अशा स्थितीत संघासाठी सामना जिंकणे सोपे नसेल.