मुंबई - ५ मार्चपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज या स्पर्धेसाठी इंडिया लेजेंड्स संघाची घोषणा करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरकडे या संघाचे कर्णधारपद देण्यात आले असून एकूण १२ खेळाडूंचा या संघात समवेश करण्यात आला आहे. या स्पर्धेचे सगळे सामने रायपुरच्या शहीद वीर नारायण स्टेडियमवर खेळवले जातील.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंग्लंड संघाची धुरा केव्हिन पीटरसकडे असणार आहे. तर, खालीद महमूद बांगलादेश लेजेंड्स संघाचे नेतृत्व करेल. मॅथ्यू हॉगार्ड, ओवेस शाह, माँटी पानेसार आणि निक क्रॉम्पटन हे इंग्लंड लेजेंड्स संघातील इतर महत्त्वाचे खेळाडू आहेत. बांगलादेश संघात नफीज इक्बाल, अब्दुर रझाक आणि मोहम्मद रफिक यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
आज इंग्लंड लेजेंड्सचा संघ रायपुरात दाखल झाला आहे. याशिवाय बांगलादेशचा संघही उद्या म्हणजे २७ फेब्रुवारीला या स्पर्धेसाठी दाखल होईल. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल या स्पर्धेचे उद्घाटन करतील. या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता इंडिया लेजेंड्स आणि बांग्लादेश लेजेंड्स या संघांमध्ये खेळवला जाईल.
कोरोनाच्या प्रवासी निर्बंधामुळे ऑस्ट्रेलिया लेजेंड्स संघाने या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. ५ मार्च ते २१ मार्च यादरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
इंडिया लेजेंड्स -
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, नमन ओझा, प्रग्यान ओझा, युसुफ पठाण.