चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात शनिवारी पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमी धावसंख्येचा बचाव करत सनरायजर्स हैदराबाद संघावर १३ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच मुंबईने सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केलं. या विजयानंतर बोलताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने हैदराबादच्या गोलंदाजांचे कौतुक केले. खास करुन राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांची गोलंदाजी खेळणे सोपे नाही, अशी कबुली रोहित शर्माने दिली.
फलंदाजीच्यावेळी मधल्या षटकांमध्ये फटकेबाजी करणे कठीण झाले होते. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. आम्हाला माहित होते की, हैदराबादसाठी धावांचा पाठलाग करणे सोपं ठरणार नाही. अशा खेळपट्टीवर गोलंदाज जेव्हा नियोजनबद्ध मारा करतात, तेव्हा कर्णधार म्हणून तुमचे काम सोपे होते, असे सामना संपल्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला.
चेन्नईची खेळपट्टी जशी होती. त्यानुसार आम्ही चांगली धावसंख्या उभारली. दोन्ही संघांनी पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण मधल्या षटकांमध्ये दोन्ही संघांकडून चुका झाल्या. हैदराबादकडे राशिद आणि मुजीब असे गोलंदाज आहेत, ज्यांच्याविरुद्ध फलंदाजी करणे नक्कीच सोपे नसते. खेळपट्टी संथ होत असताना या गोलंदाजांविरुद्ध खेळणे कधीही कठीण ठरते, असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर १५१ धावांचे माफक आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरादाखल हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अवघ्या २२ चेंडूत ४३ धावांची आक्रमक खेळी केली. सोबत कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३६ धावांचे योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा - IPL २०२१ Points Table : मुंबईची गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप; जाणून घ्या इतर संघाची स्थिती
हेही वाचा - IPL २०२१ : बंगळुरू VS कोलकाता हेड टू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड