चेन्नई - अमित मिश्राच्या फिरकीपुढे मुंबईच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय अंगलट आला. रोहित व्यतिरिक्त मुंबईचा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही. मरियालच्या जागी अमित मिश्राला संघात स्थान देण्याचा निर्णय दिल्लीच्या चांगलाच पथ्थ्यावर पडला. अमित मिश्राने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व केरॉन पोलार्ड या स्टार फलंदाजांना बाद करत मुंबईचे कंबरडे मोडले. मुंबईने २० षटकात ९ बाद १३७ धावा उभारल्या. अमित मिश्राने ४ षटकात २४ धावा देत ४ बळी घेतले. मुंबईचे ५ फलंदाज अवघ्या १७ धावांत माघारी परतले. त्यामुळे दिल्लीने जबरदस्त कमबॅक केले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ ४ गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने १ बाद ३९ धावा केल्या. ९व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर केरॉन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक ३३ धावांवर पायचित केले. सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण तो १५व्या षटकात बाद झाला. राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने ५ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावत हे आव्हान गाठले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या मुंबई इंडियन्सला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. मार्कस स्टॉयनिसने क्विंटन डी कॉकला केवळ एक धावेवर माघारी धाडले. यष्टीमागे रिषभ पंतने त्याचा झेल टिपला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवला साथीला घेत रोहितने फटकेबाजी सुरू केली. रोहितने कागिसो रबाडाला उत्तुंग षटकात ठोकला. रोहित व सूर्यकुमार यादव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २९ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. आवेश खानने ही भागीदारी तोडत सूर्यकुमार यादवला माघारी धाडले. त्याने १५ चेंडूंत ४ चौकारांसह २४ धावा केल्या. अमित मिश्राने दुसऱ्याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांना एकाच षटकात माघारी पाठवले. रोहितनं ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक पांड्या प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला.
त्यानंतर कृणाल पांड्या एक धाव काढून माघारी परतला. मुंबईचा निम्मा संघ ८१ धावांवर तंबूत परतला. किरॉन पोलार्ड आज पुन्हा एकदा मुंबईचा तारणहार ठरेल असे वाटत असताना अमित मिश्राने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून केवळ २ धावांवर माघारी पाठवले. मुंबई इंडियन्सने १७ धावांत पाच महत्वाचे फलंदाज गमावले आणि यापैकी तीन बळी अमित मिश्राने टिपले. शेवटी जयंत यादवने २२ चेंडूत २३ धावांची खेळी केल्याने मुंबईला सव्वाशेचा पल्ला ओलांडता आला.