चेन्नई - चिंदबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा ७ गडी राखून विजय मिळविला. कोलकाताने चेन्नईपुढे विजयासाठी १०९ धावांचे आव्हान दिले आहे. आंद्रे रसेलच्या ५० धावांच्या जोरावर कोलकाताने २० षटकात ९ बाद १०८ धावा केल्या. कोलकाताने दिलेले हे सोपे आव्हान चेन्नईने १७.२ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले.
चेन्नईकडून शेन वॉटसन १७, फॉफ डुप्लेसिस नाबाद ४३, सुरेश रैना १४, अंबाती रायुडू २१ आणि केदार जाधवने ८ धावा काढल्या. कोलकाताकडून सुनील नरेनने २४ धावात २ गडी बाद केले तर पीयुष चावलास २८ धावात १ गडी बाद करण्यात यश आले.
चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दीपक चाहर आणि हरभजन सिंह यांनी भेदक गोलंदाजी करत कोलकाताच्या फलंदाजीस खिंडार पाडले. सुरुवातीला ख्रिस लेन शून्यावर बाद झाला. सुनील नरेन ६ धावा काढून बाद झाला. दिनेश कार्तिकने १९ धावांचे योगदान दिले.
दीपक चाहरची धारदार गोलंदाजी
आंद्रे रसेलने ४४ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत ५० धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईच्या गोलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. कोलकाताच्या ४ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. दीपक चाहरने धारदार गोलंदाजी करत २० धावा देत ३ बळी घेतले. इम्रान ताहिरने २१ धावा देत २ गडी बाद केले. हरभजन सिंहला १५ धावात २ गडी बाद करण्यात यश आले. रविंद्र जाडेजाला एकमेव बळी टिपण्यात यश आले.