सेंच्युरियन : भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार वळणावर पोहोचला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ 174 धावावर गारद झाला. परंतु पहिल्या डावात मिळालेल्या 130 धावांच्या आघाडीमुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 305 धावांचे आव्हान उभे राहिले आहे. ही धावसंख्या त्यांच्यासाठी खूपच अवघड असल्याचे मानले जाते. त्यामुळे भारतीय संघाची पहिल्या कसोटीवर मजबूत पकड बनली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 4 गडी बाद होत 94 धावा केल्या आहेत.
भारताचा दुसरा डाव गडगडला
चौथ्या दिवसाच्या खेळात भारतीय संघाने 10 गड्यांच्या मोबदल्यात 174 धावा केल्या. केएल राहुल 23, मयंक अग्रवाल 4, शार्दुल ठाकूर 10, चेतेश्वर पुजारा 16, विराट कोहली 18, अजिंक्य रहाणे 20, ऋषभ पंत 34, रविचंद्रन अश्विन 14, मोहम्मद शामी 1 व मोहम्मद सिराज 0 धावावर बाद झाले तर जसप्रित बुमराह 7 धावावर नाबाद राहिला.
कागिसो रबाडाने व मार्को जेन्सने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या तर लंगी एनगिडीला 2 विकेट मिळाल्या.
तिसऱ्या दिवसानंतर सामन्याला वळण
सामन्याचा तिसरा दिवस हा भारतीय गोलंदाजांनी गाजवला आहे. दिवसाच्या सुरुवातील भारतीय संघाचा डाव ३ बाद २७२ वरून सुरू झाला आणि अवघ्या काही तासातच ३२७ धावांवर संपला. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला आणि दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड दिला. मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांवर आटोपला.
भारताचा पहिला डाव
भारतीय संघाला पहिल्या डावात १३० धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. भारताने दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ३२ अशी अवस्था केली होती, मात्र तेम्बा बवुमाने ५२ धावांची दमदार खेळी करीत संघाला सावरले. बवुमाला मोहम्मद शमीने बाद केले आणि त्यांची ७ बाद १४४ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर कागिसो रबाडाने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत चांगली झुंज दिली आणि संघाला १९७ धावांचा पल्ला गाठून दिला.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा दिवस पावसामुळे वाया गेला. याआधी भारतीय संघाने ३२७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये केएल राहुलने भारतासाठी या डावात शतक झळकावले. राहुलने 260 चेंडूत 123 धावा केल्या. त्यानंतर मयंक अग्रवालने 60 धावा केल्या, तर कोहलीने 35 धावा जोडल्या. रहाणेने 48 धावा केल्या मात्र त्याचे अर्धशतक 2 धावांनी हुकले. शेवटी, बुमराहने 2 चौकार मारले, यात त्याने 14 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडीने 6 आणि रबाडाने 3 बळी घेतले. या दोघांशिवाय अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
हेही वाचा - भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेने नांगी टाकली, पहिल्या डावात भारताला मोठी आघाडी