Ind vs SL : कृणाल पांड्याच्या संपर्कातील 'त्या' 8 जणांचे रिपोर्ट आले - बीसीसीआय
कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 8 खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. या खेळाडूंचे रिपोर्ट आले असून यात सर्व खेळाडू निगेटिव्ह आले आहेत. यामुळे ते सर्व खेळाडू आज होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध असतील.

कोलंबो - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला मंगळवारी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यामुळे मंगळवारी होणारा श्रीलंकेविरुद्धचा टी-20 स्थगित करण्यात आला होता. आता या प्रकरणातील महत्वाचे अपडेट समोर आले आहेत.
कृणाल पांड्या उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पुढील सात दिवस क्वारंटाइन राहिल.
कृणाल पांड्याच्या संपर्कातील खेळाडूंचा रिपोर्ट काय आला
कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील 8 खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. आज या खेळाडूंचे रिपोर्ट आले असून यात सर्व खेळाडू निगेटिव्ह आले आहेत. यामुळे ते सर्व खेळाडू आज होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध असतील.
बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं की, "कृणालमध्ये लक्षणे होती. त्याला खोकला आणि घस्याचा त्रास होत होता. त्यावेळी त्याची चाचणी करण्यात आली. तो बाधित आढळल्याने मालिकेतून बाहेर झाला आहे."
टीम इंडिया भारतात परतली तरी कृणाल श्रीलंकेतच राहणार -
भारतीय संघ श्रीलंकाविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर 30 जुलै रोजी भारतात परतणार आहे. परंतु कृणाल पांड्याला श्रीलंकेतच राहावं लागणार आहे. श्रीलंकेच्या प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर कृणालची पुन्हा चाचणी करण्यात येईल. यात त्याचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर कृणालला प्रवास करण्याची मुभा मिळेल.
दरम्यान, बीसीसीआय सचिन जय शाह यांनी 27 जुलै रोजीचा सामना 28 जुलै रोजी होणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यानुसार, आज उभय संघात आज टी-20 सामना खेळवला जाणार आहे.
हेही वाचा - IND VS SL : भारतीय क्रिकेटर कृणाल पांड्याला कोरोनाची लागण
हेही वाचा - भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन, शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली