ब्रिस्बेन - भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना ३ गड्यांनी जिंकत मालिका २-१ ने खिशात घातली. या सामन्यानंतर अजिंक्यसेनेने प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू नाथन लायनला खेळांडूची स्वाक्षरी असेलेली जर्सी भेट म्हणून दिली. ब्रिस्बेनच्या गाबा खेळपट्टीवर रंगलेली ही कसोटी लायनची १००वी कसोटी होती. या खास कसोटीनिमित्त लायनला ही जर्सी मिळाली.
ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा लायन १३वा खेळाडू ठरला आहे. तथापि, ही कसोटी लायनसाठी कमनशिबी ठरली. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळून त्याला ३ बळी मिळवता आले. संपूर्ण मालिकेत लायनने ४०.७३च्या सरासरीने एकूण ११ बळी मिळवले.
नाथन लायनने १८ वेळा पाच बळी घेण्याची किमया केली आहे. ५० धावांत ८ बळी ही लायनची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २९ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये त्याने १०० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. जून २०१५ मध्ये त्याने ह्यू ट्रंबचा १४२ बळींचा विक्रम मोडत ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील सर्वात यशस्वी ऑफस्पिनर होण्याचा मान पटकावला.
टीम इंडियाच्या या कामगिरीनंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा निर्णायक सामना जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाची गेल्या ३ दशकातील ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याची मालिका खंडीत केली आहे. १९८८ पासून ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारलेला नव्हता.