मेलबर्न - आयपीएलचा हंगाम संपताच या महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर चषकासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. यावेळीही भारतच या चषकाचा प्रबळ दावेदार असून कर्णधार विराट कोहलीची कामगिरी शानदार होण्याची शक्यता असल्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉने म्हटले आहे. त्याशिवाय भारतीय कर्णधार विराट कोहलीविषयी एक महत्त्वाचा सल्ला त्यांनी संघाला दिला आहे.
मैदानावर कोहलीला डिवचल्याचा कोणताही परिणाम होत नाही. त्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करणे संघाच्या हिताचे आहे. उलट त्याच्याशी छेडछाड केल्यास तो आक्रमक खेळी करू शकतो. त्यामुळे शेरेबाजी, हुज्जत घालण्याचे अस्त्र त्याच्याविरूद्ध वापरू नका, असे स्टीव्ह वॉने म्हटले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान डिसेंबर-जानेवारी महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. आयपीएलनंतर ही महत्त्वाची स्पर्धा असेल.
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली
2018-19 मध्ये कोहलीच्या नेतृत्वात कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली होती. अशी कामगिरी करणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला होता. त्या मालिकेत चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि कोहलीने चांगली फलंदाजी केली होती. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी गोलंदाजीची चांगली कमान सांभाळली होती. त्यामुळे कांगारूंना त्यांच्या भूमीवर भारताला नमवता आले. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघामध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर नव्हते. त्यांना बॉल टेंपरिंग प्रकरणावर बंदीचा सामना करावा लागला होता.
वॉ म्हणाले, कोहली हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. तो मालिकेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बनू शकतो. त्याला धावा करायच्या आहेत आणि आपल्याला त्याला रोखण्याचे काम करायचे आहे. परंतु, 'स्लेजिंग' न करता त्याला चांगल्या चेंडूंनी रोखता येऊ शकते. आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की, कोहलीची बॅट चालली तर भारताला पुन्हा जिंकण्याची चांगली संधी मिळू शकते.