नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील सिडनी कसोटी बरोबरीत सुटली. ही कसोटी वर्णद्वेषी शेरेबाजीमुळे सर्वांच्याच लक्षात राहिली. मेरिलबोन क्रिकेट क्लबचा (एमसीसी) अध्यक्ष कुमार संगकाराने क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या या शेरेबाजीबद्दल भाष्य केले आहे.
कुमार संगकाराने या घटनेचा निषेध केला आहे. शिवाय त्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली. अबुधाबी टी-१० दरम्यान संगकारा म्हणाला, "गेल्या काही दिवसांत सिडनीमध्ये भारतीय संघाबरोबर जे काही झाले, त्याबद्दल मी वाचले. कोणत्याही देशात कोणत्याही प्रकारचा वंशभेद स्वीकारला जाणार नाही. जबाबदार असणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी."
हेही वाचा - ''काही टिप्स पाहिजे असतील तर मला मेसेज कर'', वॉर्नरचा विराटला सल्ला
"माझ्या काळात मी कधीही कोणत्याही प्रकारच्या जातीय अत्याचाराला बळी पडलो नाही. श्रीलंकेच्या इतर क्रिकेटपटूंच्या वतीने मी बोलू शकत नाही, परंतु मी वैयक्तिकरित्या वर्णद्वेषाच्या टीकेचा सामना केला नाही. मी ज्या देशांचा दौरा केला त्या सर्वांसाठी हे सत्य आहे", असेही संगकाराने सांगितले.
नक्की प्रकरण काय?
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिपण्णी केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी सिराजला पुन्हा एकदा अशा टिपण्णीचा सामना करावा लागला. यासंदर्भात भारतीय संघाने पंचांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काही काळ सामना थांबवण्यात आला आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सहा जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.