नवी दिल्ली - दुखापतग्रस्त भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सहा आठवड्यांसाठी विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून आता तो बुधवारी ऑस्ट्रेलियाहून भारतासाठी रवाना होईल. भारत गाठल्यानंतर शमीला क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे.
हेही वाचा - क्रिकेटर युझवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत
अशी झाली शमीला दुखापत...
अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारताच्या दुसर्या डावात फलंदाजी करताना शमीला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा वेगवान चेंडू शमीच्या हातावर आदळला. वेदनेमुळेही तो हातही वर करू शकला नव्हता. जखमी झाल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. दुसऱ्या डावात तो गोलंदाजीही करू शकला नाही.
शमीच्या अहवालात फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो उर्वरित कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. "शमीला सहा आठवड्यांचा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि तो आता बुधवारी भारतात रवाना होईल. सहा आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तो जानेवारीच्या अखेरीस फिट होईल," अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय, या दुखापतीमुळे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी शमी संघात नसेल असेही वृत्त आहे.
भारताच्या संकटात वाढ...
शमी मालिकेमधून बाहेर पडल्याने भारताला मोठा फटका बसला आहे कारण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आधीच दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तर कर्णधार विराट कोहलीही आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे मायदेशी परतला आहे. मागील ऑस्ट्रेलिया दौर्यावर शमीने १६ बळी घेतले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी सामना आता २६ डिसेंबरपासून (बॉक्सिंग डे) मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे सुरू होईल.