सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी अनिर्णित सुटली. अतिशय रंगतदार पद्धतीने झालेल्या या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी पूर्ण दिवस फलंदाजी करत सर्वांचा वाहवा मिळवली. त्यामुळे बॉर्डर-गावसकर मालिकेत अजुनही दोन्ही संघ तुल्यबळ अवस्थेत आहेत. आता सर्वांचे लक्ष गाबा कसोटीकडे लागले आहे. मात्र, या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा तडाखा बसण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा - ICC Test Rankings : विराटचे दुसरे स्थानही गेले; अजिंक्य, अश्विनसह बुमराहला फटका
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज विल पुकोव्स्कीच्या गाबा कसोटीसाठी संघातील समावेशाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खुद्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबद्दल माहिती दिली. भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विल पुकोस्कीच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेण्यास विलंब होईल, जेणेकरून या सलामीवीरला आपली फिटनेस सिद्ध करण्याची पूर्ण संधी मिळेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी सांगितले.
सिडनी कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना पुकोव्स्कीच्या खांद्याला दुखापत झाली. आगामी दोन दिवस तो विश्रांती घेईल. त्यानंतर तो रिहॅबमध्ये राहील. यानंतर त्याच्या संघातील समावेशाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे सीएच्या प्रवक्त्याने सांगितले.
कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या पुकोव्स्कीने पहिल्या डावात ६२ धावा केल्या. पण दुसर्या डावात तो दहा धावांवर बाद झाला. गेल्या महिन्यात सराव सामन्यादरम्यानही त्याला दुखापत झाली होती.
भारतीय संघालाही दुखापतींचे ग्रहण -
सध्या भारतीय संघातील गोलंदाजी विभागातील सर्व वरीष्ठ खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्याचबरोबर फलंदाजी विभागात सुद्धा दुखापती खेळाडूंची संख्या कमी नाही. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा, केएल राहुल यांना दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडावे लागले आहे. तसेच तिसऱ्या कसोटीदरम्यान हनुमा विहारीही हॅमस्ट्रिंगमुळे त्रस्त होता. जसप्रीत बुमराहही चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भारतीय संघासमोर चौथ्या कसोटीसाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.