लंडन - इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्यासाठी, काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशात भारतीय क्रिकेट संघाच्या गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. भारताचा सलामी फलंदाज मयांक अगरवाल याच्या डोक्याला सरावादरम्यान, चेंडू लागला आहे. यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकला आहे. याआधी सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
बीसीसीआयने या संदर्भात सांगितलं की, 'नेटमध्ये सराव करताना, सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल याला हेल्मेटवर चेंडू लागला. बोर्डाची मेडिकल टीम मयांकवर उपचार करत आहे. पण त्याची दुखापत पाहता तो पहिला कसोटी सामना खेळू शकणार नाही. मयांकची प्रकृती स्थिर असून तो मेडिकल टीमच्या निघराणीत उपचार घेत आहे.'
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर आवेश खान आणि वॉशिग्टन सुंदर यांना देखील सराव सामन्यात दुखापत झाली. यामुळे ते देखील इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडले. आता मयांकला दुखापत झाल्याने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. मयांकला सरावादरम्यान, मोहम्मद सिराजचा वेगवान उसळता चेंडू लागला.
भारताकडे रोहित शर्मासोबत डावाची सुरूवात करण्यासाठी के एल राहुलच्या रुपाने एक पर्याय शिल्लक आहे. दरम्यान, बीसीसीआयने पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांना रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून निवडलं आहे.
हेही वाचा - India Tour Of Sri Lanka: भारतीय संघातील आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची लागण
हेही वाचा - श्रीलंकन अष्टपैलू खेळाडू इसुरू उदानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती