नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कसोटी मालिकेत रोहित शर्मा भारताचे कर्णधारपद सांभाळेल तर केएल राहुल उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी भारताचा सुपरस्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला आहे. तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे पुनरागमन संघाला बळ देईल. यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतला पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते.
५ महिने क्रिकेटपासून दूर : रवींद्र जडेजाने ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगविरुद्ध सामना झाला होता. या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो ५ महिने क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीमुळे जडेजा ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी : जडेजा आणि अश्विन हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघातील मुख्य फिरकी गोलंदाज आहेत. ते पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मधल्या फळीला मजबूत करतात. जडेजाने 2016-17 मध्ये भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. भारताने या द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला होता. धर्मशाला येथील शेवटच्या कसोटीत जडेजाने ६३ धावांची खेळी आणि चार बळी घेतले होते. या मालिकेत एकूण 25 विकेट्स आणि 127 धावा करणाऱ्या जडेजाला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आले होते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक : 1ली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर ; दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली ; तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला ; चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद ; भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव ; ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.
हेही वाचा : Women T20 Tri Series : दक्षिण आफ्रिकेने पटकावले महिला तिरंगी मालिकेचे विजेतेपद, भारताचा 5 गडी राखून पराभव