इंदूर- IND vs AFG T20I : रविवारी इंदौरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा पुन्हा एकदा शून्यावर आऊट झाला. पहिल्याच चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला. फजल हक फारुकीनं त्याला बाद केलं. मोहालीतही या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही रोहित खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. लगातार दोन सामन्यात शुन्यावर आऊट झाल्यामुळं तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विक्रम करण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा हा विक्रम आहे.
कोणता लाजिरवाणा विक्रम होणार : रोहित शर्मा आत्तापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 12 वेळा शून्यावर आऊट झालाय. क्रिकेटच्या या प्रकारामध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत तो आता दुसऱ्या क्रमांकावर आलाय. यात आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग पहिल्या क्रमांकावर आहे. तो 13 वेळा शून्यावर आऊट झालाय. म्हणजेच या यादीत पहिल्या क्रमांकावर येण्यात रोहित शर्माही मागं नाही. अशा परिस्थितीत तो टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या लाजिरवाण्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचलाय.
रोहित दीर्घ विश्रांतीनंतर परतला टी-20 मध्ये : रोहित शर्मा दीर्घ कालावधीनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलाय. अफगाणिस्तान मालिकेत तो भारताच्या टी-20 संघात परतला आहे. याआधी तो 2022 च्या टी-20 विश्वचषकात दिसला होता. म्हणजेच तो एका वर्षाहून अधिक काळ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आगामी 2024 टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवड समितीनं त्याला क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारात परत आणलंय.
150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला खेळाडू : इंदौरमध्ये रविवारी झालेल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मानं मोठी कामगिरी केलीय. 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. रोहितनं आतापर्यंत 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 30.82 च्या सरासरीनं आणि 139 च्या स्ट्राईक रेटनं 3853 धावा केल्या आहेत. त्यानं टी-20 मध्ये 4 शतकं आणि 29 अर्धशतकंही केली आहेत.
हेही वाचा :