हैदराबाद History of ODI Cricket : आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 5 जानेवारीच्या दिवसाला विशेष स्थान आहे. पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना (ODI) आज (5 जानेवारी 1971) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळला गेला होता. सध्या एकदिवसीय सामने 50-50 षटकांचे असले तरी हा पहिला एकदिवसीय सामना 40-40 षटकांचा होता. या प्रकारचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता आणि 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एडरिचनं एकदिवसीय इतिहासातील पहिला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावलाय. या सामन्यात नाणेफेक हरल्यावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 39.4 षटकांत (8 चेंडूंचं 1 षटक) 190 धावांवर सर्वबाद झाला. तर ऑस्ट्रेलियानं 42 चेंडू बाकी असताना 5 विकेट्स गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं होतं.
कशी झाली एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात : एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात होण्याची कहाणी खूप मजेशीर आहे. इंग्लंडचा संघ 7 सामन्यांच्या अॅशेस मालिकेसाठी नोव्हेंबर 1970 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिला आणि दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेन आणि पर्थ इथं झाला. हे दोन्ही सामने अनिर्णित राहिले. तिसरा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (31 डिसेंबर 1970 ते 5 जानेवारी 1971) होणार होता. पण पावसामुळं सामना सुरू झाला नाही. त्यावेळी 6 दिवसांचा कसोटी सामना असायचा, त्यात एक दिवस 'विश्रांतीचा दिवस' असायचा. अशा स्थितीत सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाऊस थांबला तेव्हा दोन्ही संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज झाले आणि त्यामुळं क्रिकेटचा नवा प्रकार उदयास आला. विशेष म्हणजे मेलबर्नच्या स्थानिक लोकांचे मनोरंजन आणि खेळाडूंचा आर्थिक फायदा लक्षात घेऊन दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांचा सामना खेळवण्यात येईल, असा निर्णय दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा सामना पाहण्यासाठी त्या मैदानावर 46 हजार प्रेक्षक जमले होते.
पहिल्या एकदिवसीय सामन्याची वैशिष्ट्ये :
- पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, गोलंदाज एका षटकात 8 चेंडू टाकायचा.
- टॉम ब्रूक्स आणि लू रोवेन यांनी क्रिकेट इतिहासातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंपायरची भूमिका बजावली.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये, इंग्लंडच्या जेफ्री बॉयकॉटनं पहिल्या चेंडूचा सामना केला आणि तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाद होणारा पहिला फलंदाज देखील होता.
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा अॅलन थॉमसन हा पहिलं षटक टाकणारा गोलंदाज होता.
एकदिवसीय क्रिकेटमधील महत्त्वाचे सामने :
- पहिला एकदिवसीय सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, विजेता ऑस्ट्रेलिया, 5 जानेवारी 1971
- 1000 वा एकदिवसीय सामना : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉटिंगहॅम, विजेता वेस्ट इंडिज, 24 मे 1995
- 2000 वा एकदिवसीय सामना : पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, शारजाह, विजेता पाकिस्तान, 10 एप्रिल 2003
- 3000 वा एकदिवसीय सामना : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, साउथम्प्टन, विजेता इंग्लंड, 22 जून 2010
- 4000 वा एकदिवसीय सामना : हाँगकाँग विरुद्ध पापुआ न्यू गिनी, हरारे, पापुआ न्यू गिनी विजेता, 17 मार्च 2018
- आतापर्यंत सुमारे 4600 हून अधिक एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमधील महत्त्वाचे विक्रम :
- सर्वाधिक धावा : सचिन तेंडूलकर (भारत) 18426 धावा
- सर्वाधिक वयक्तिक सामने : सचिन तेंडूलकर (भारत) 463 सामने
- सर्वाधिक अर्धशतकं : सचिन तेंडूलकर (भारत) 96 अर्धशतकं
- सर्वाधिक शतकं : विराट कोहली (भारत) 50 शतकं
- सर्वाधिक वैयक्तिक धावा : रोहित शर्मा (भारत) 264 धावा, विरुद्ध श्रीलंका
- सर्वाधिक षटकार : शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) 351 षटकार
- सर्वाधिक चौकार : सचिन तेंडूलकर (भारत) 2016 चौकार
- सर्वाधिक सांघिक धावसंख्या : इंग्लंड 498/4 धावा, विरुद्ध नेदरलॅंड्स, 17 जुन 2022
- सर्वात कमी सांघिक धावसंख्या : झिम्बाब्वे 35 धावा विरुद्ध श्रीलंका
- सर्वाधिक बळी : मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) 534 बळी, 350 सामने
- सर्वोेकृष्ट गोलंदाजी : चामिंडा वास (श्रीलंका) 8/19 विरुद्ध झिम्बाब्वे, 08 डिसेंबर 2001
- सर्वात मोठा विजय (धावांनी) : भारत 317 धावांनी विजय श्रीलंकेविरुद्ध, 15 जानेवारी 2023
कोणत्या संघानं कधी केली एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात :
- ऑस्ट्रेलिया (5 जानेवारी 1971)
- इंग्लंड (5 जानेवारी 1971)
- न्यूझीलंड (11 फेब्रुवारी 1973)
- पाकिस्तान (11 फेब्रुवारी 1973)
- वेस्ट इंडिज (5 सप्टेंबर 1973)
- भारत (13 जुलै 1974)
- श्रीलंका (7 जून 1975)
- झिम्बाब्वे (6 जून 1983)
- बांगलादेश (31 मार्च 1986)
- दक्षिण आफ्रिका (10 नोव्हेंबर 1991)
हेही वाचा :