लंडन - मागील काही सामन्यात भारताचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अपयशाची मालिका इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात देखील कायम राहिली. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
असे असले तरी भारतीय व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली, पुजारा आणि रहाणेच्या पाठिमागे खंबीर उभा आहे. आता यात आणखी एक खेळाडूची भर पडली आहे. पहिल्या डावात शतक ठोकणारा सलामीवीर केएल राहुलने देखील पुजारा आणि रहाणेची पाठराखण केली. तो म्हणाला की, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे विश्वस्तरावरील दिग्गज फलंदाज असून ते लवकरच वापसी करतील.
केएल राहुल लॉर्डस् कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसांचा खेळ संपल्यानंतर माध्यमाशी बोलताना म्हणाला की, पुजारा आणि रहाणे या दोघांनी संघ अडचणीत असताना अनेक वेळा संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. ते विश्वस्तरीय आणि अनुभवी खेळाडू आहेत. यामुळे त्यांना कल्पना आहे की दोन तीन डावातील अपयश कसे धुवून काढायचे.
तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, ते कठिण परिस्थितीत खेळत आहेत. इंग्लंडमध्ये प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे, असे देखील राहुल म्हणाला.
दरम्यान, पुजारा आणि रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपेक्षित खेळी करता आलेली नाहीत. रहाणेने आतापर्यंत दोन डावात 6 तर पुजाराने या मालिकेतील 3 डावात 25 धावा केल्या आहेत.
के एल राहुलचे शानदार शतक -
के एल राहुल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला उतरला होता. राहुल-रोहित जोडीने भारताला 126 धावांची सलामी दिली. रोहित बाद झाल्यानंतर राहुलने एक बाजू लावून धरत शतक झळकावले. त्याने 250 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकारासह 129 धावा केल्या. रॉबिन्सनने राहुलची खेळी संपुष्टात आणली. त्याने राहुलला सिब्लीकडे झेल देण्यास भाग पाडले.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी IPLच्या उर्वरित हंगामात का खेळलं पाहिजे, रिकी पाँटिगने सांगितलं कारण
हेही वाचा - Ind vs Eng: प्रेक्षकांचे के एल राहुलसोबत गैरवर्तन, अंगावर फेकले शॅम्पेनच्या बाटलीचे कॉर्क