कोलंबो - श्रीलंकेचा आक्रामक सलामीवीर फलंदाज दनुष्का गुणातिलक यांने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वयाच्या 30 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC) ने शनिवारी ही माहिती दिली.
एसएलसीने म्हटले की, दनुष्का गुणातिलक आता एकदिवसीय क्रिकेट व टी-20 सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.
बायोबबल पद्धतीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणातिलक, कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांच्यावर एक वर्षासाठी प्रतिबंध लादण्यात आला होता. हे प्रतिबंध हटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 30 वर्षाचा आणखी एक फलंदाज भानुका राजपक्षे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर गुणातिलकने ही घोषणा केली.
दनुष्का गुणातिलक याने म्हटले की, सर्व बाजूंनी विचार केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. गुणातिलक याने 2018 पासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. गुणातिलक याने आठ कसोटी सामन्यात दो अर्धशतक झळकावून 299 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोर 61 होता.
गुणातिलकने मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्याने 44 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 36.19 च्या सरासरीने 1,520 धावा केल्या आहेत. तर 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 121.62 च्या स्ट्राइक रेटने 568 धावा केल्या आहेत.
मागील वर्षी श्रीलंकेच्या इंग्लंड दौऱ्यात बायोबबल नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुणातिलक, मेंडिस आणि डिकवेला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वर्षाचे प्रतिबंध लादले होते. या प्रतिबंधामध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये सहा महिन्याचे निलंबन व सुमारे 50 हजार डॉलरचा दंड सामील होते. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर गुणातिलक याला एसएलसीने तीन बार निलंबित केले आहे.