मुंबई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. यातील पहिला सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. उभय संघातील या सामन्यासाठी भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरने अंतिम संघ निवडला आहे.
जाफरने त्याच्या आवडीच्या संघाची, सलामीची जबाबदारी हिटमॅन रोहित शर्मा आणि युवा शुबमन गिल यांच्यावर सोपविली आहे. जाफरने तिसऱ्या क्रमाकांवर चेतेश्वर पुजाराला ठेवले आहे. मधल्या फळीची धुरा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे. सहाव्या क्रमाकांवर जाफरने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या ऋषभ पंतला पसंती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या वॉशिग्टन सुंदरला जाफरने आपल्या संघात स्थान दिलेले नाही. त्याच्या जागेवर जाफरने अक्षर पटेलला स्थान दिले आहे. अक्षर याच्याशिवाय जाफरने अनुभवी रविचंद्रन अश्विनला आपल्या संघात निवडले आहे.
गोलंदाजीची धुरा जाफरने जसप्रीत बुमराह याच्यावर सोपविली आहे. तर कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला त्याने आपल्या संघात घेतले आहे. इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला जाफरने पसंती दिली आहे.
असा आहे चेन्नई कसोटीसाठी वसीम जाफरने निवडलेला संघ -
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव / शार्दुल ठाकुर, इशांत शर्मा / मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
हेही वाचा - टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीची अर्थमंत्र्यांकडून दखल, म्हणाल्या...
हेही वाचा - टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह