हॅमिल्टन - ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी टी-२० विश्व करंडक स्पर्धा होणार असून सर्व संघांनी या स्पर्धेच्या दृष्टीने तयारीला सुरूवात केली आहे. भारतीय संघात देखील या स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर नवनविन बदल पाहायला मिळत आहेत. भारतीय संघाला विश्वकरंडकाआधी मोजकेच सामने सरावासाठी मिळणार आहेत. यामुळे कर्णधार विराट कोहलीने विश्वकरंडकाच्या तयारीसाठी आयपीएलचा पुरेपूर वापर करणार असल्याचे सांगितले.
भारतीय संघ सद्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीने टी-२० मालिका ५-० ने जिंकली. टी-२० मालिका विजयानंतर विराटसेना आता उद्या (बुधवार) पासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत विराटने पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
विराटला टी-२० विश्वकरंडकाविषयी विचारले असता त्याने सांगितले की, 'क्रिकेटच्या फॉरमॅटनुसार तुम्हाला आपल्या खेळात बदल करावा लागतो. एकदिवसीय क्रिकेटसाठी तुम्हाला वेगळी रणणिती आखावी लागते. आम्ही आता पाच टी-२० सामने खेळलेलो आहोत. यानंतरही आम्हाला टी-२० सामने खेळण्यास मिळतील. पण आयपीएलच्या रुपाने आम्हाला जवळपास दीड महिने टी-२० सामने खेळण्याचा सराव होईल. आयपीएलचा वापर आम्ही विश्व करंडकाच्या तयारीसाठी करु.'
दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिकेला उद्या (बुधवार) पासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - U१९ विश्वकरंडक : भारतीय गोलंदाजांसमोर पाकची शरणागती, विजयासाठी १७३ धावांचे आव्हान
हेही वाचा - IND vs NZ : टीम इंडिया नव्या सलामीवीर जोडीसह उतरणार मैदानात, विराटने दिले संकेत