दुबई - आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आहे. विराटच्या खात्यात ८६२ गुण असून असून या यादीत ९१९ गुणांसह न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन अव्वल स्थानी विराजमान आहे.
हेही वाचा - वॉर्नरच्या मुलीला विराटचे 'खास' गिफ्ट
या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पुजाराला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर अजिंक्य आठव्या स्थानी आहे.
गोलंदाजांमध्ये अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स पहिल्या, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर तिसर्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलू कसोटीपटूंच्या यादीत रवींद्र जडेजा आणि अश्विन अनुक्रमे तिसर्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तर, इंग्लंडचा बेन स्टोक्स अव्वल स्थानी कायम आहे.