नवी दिल्ली - कर्णधार म्हणून ११००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा वेगवान फलंदाज ठरल्यानंतर विराटला अजून एक विक्रम खुणावतो आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने घरच्या मैदानावर आणखी एक शतक ठोकले तर तो सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
हेही वाचा - पांड्याची 'मॉन्स्टर' कामगिरी, दिग्गज कंपनीचा बनला ब्रँड अॅम्बेसेडर!
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके ठोकणाऱ्या सचिनने भारतात २० शतके केली आहेत. तर, कोहलीने आतापर्यंत भारतात १९ शतके ठोकली आहेत. विराट सातत्याने क्रिकेट खेळत असून नवीन वर्षातही त्याने आपला चांगला फॉर्म कायम राखला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने नवीन वर्षाचा शुभारंभ विजयाने केला. नुकतीच पार पडलेली श्रीलंकेविरुद्धची मालिका भारताने २-० ने जिंकली. पुण्यात खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून ११००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तो वेगवान फलंदाज ठरला. या सामन्यातील १३ व्या षटकात त्याने हा विक्रम रचला होता.
या सामन्यात विराट सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. याआधी त्याने २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्ध सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तेव्हा तो दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतला. मात्र, लंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि धावबाद झाला.