पुणे - गहुंजेवर सुरू असलेल्या आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने २५४ धावांची आतषबाजी खेळी केली. या खेळीसोबत त्याने भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले.
हेही वाचा - 'जंबो' सांभाळणार किंग्स इलेव्हन पंजाब संघाची धुरा
या सामन्यात विराटने ३३६ चेंडूंचा सामना करत नाबाद २५४ धावा रचल्या. त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत तब्बल ३३ चौकार लगावले. विराटने आत्तापर्यंत ७ द्विशतके रचली आहेत. त्याने सचिन आणि सेहवागचा सहा द्विशतकांचा विक्रम मोडित काढला. सर्वाधिक द्विशतके ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन हे अग्रस्थानी आहेत. त्यांनी कसोटीत १२ द्विशतके केली आहेत. तर, लंकेच्या कुमार संगकाराने ११ आणि विंडीजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराने ९ द्विशतके रचली आहेत.
या व्यतिरिक्त कसोटीत ७००० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. विराटअगोदर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, व्हिव्हिएस लक्ष्मण, विरेंदर सेहवाग आणि सौरभ गांगुली यांनीही ७००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
५० व्या कसोटीत विराटचे शतक -
क्रिकेटच्या कारकिर्दीतील ५० व्या कसोटीत शतक ठोकण्याचा मानही विराटला मिळाला आहे. आतापर्यंत स्टीफन फ्लेमिंग, अलिस्टर कुक आणि स्टीव्ह वॉ यांनी ५० व्या कसोटीत शतक ठोकले आहे.