नवी दिल्ली - क्रिकेटची प्रसिद्ध वेबसाइट असलेल्या क्रिकबझने विराट कोहलीला या दशकाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान मिळाले नसले तरी रोहित शर्माला सलामीवीराची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा - २०११ वर्ल्डकपच्या उपविजेत्या संघाचा खेळाडू सैन्यात झाला भर्ती
या संघात भारताचे दोन खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या तीन आणि न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश या संघांतील प्रत्येकी एका खेळाडूची क्रिकबझच्या संघात निवड झाली आहे.
रोहितबरोबर सलामीचा फलंदाज म्हणून ही जबाबदारी दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलावर सोपवण्यात आली आहे. अमलाव्यतिरिक्त एबी डिव्हिलियर्स आणि इम्रान ताहिर यांना या संघात स्थान मिळाले आहे. फलंदाजीत अनुभवाला प्राधान्य दिले गेले असून त्यासाठी न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार रॉस टेलर यालाही संघात स्थान मिळाले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून शाकिब अल हसन आणि यष्टीरक्षक म्हणून जोस बटलरला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांच्याकडे आहे. दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर हा संघातील एकमेव फिरकीपटू असून त्याला मदत करण्यासाठी शाकिबही संघात आहे.
क्रिकबझचा एकदिवसीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, हाशिम अमला, रॉस टेलर, अब्राहम डीव्हिलियर्स, साकिब अल हसन, जोस बटलर, मिशेल स्टार्क, लसिथ मलिंगा, इम्रान ताहिर आणि ट्रेंट बोल्ट.