जयपूर - शार्दुल ठाकूर (९२), सूर्यकुमार यादव (९१) आणि आदित्य तरे (८३) या तिघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक स्पर्धेत हिमाचल प्रदेशचा पराभव केला. मुंबईने सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात हिमाचलचा २०० धावांनी पराभव केला. एलिट ग्रुप डी मध्ये मुंबईचा हा सलग पाचवा विजय आहे. या ग्रुपमध्ये मुंबई २० गुणांसह पहिल्या स्थानी आहे.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ बाद ३२१ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरादाखल हिमाचलचा संघ २४.१ षटकात १२१ धावांत ऑलआउट झाला. हिमाचलकडून मयांक डागरने सर्वाधिक नाबाद ३८ धावा केल्या. तर मुंबईकडून प्रशांत सोलंकीने चार गडी बाद केले. शम्स मुलानीने ३ तर धवन कुलकर्णीने २ गडी बाद केले. मोहित अवस्थीने एक गडी टिपला.
मुंबईने प्रथम फलंदाजी केली. तेव्हा मुंबईचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले होते. यशस्वी जैस्वाल (२), पृथ्वी शॉ (२) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (२) हे अपयशी ठरल्यानंतर फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवने मुंबईची पडझड रोखली. त्याने सर्फराज खानसह चौथ्या विकेटसाठी ४१ धावा जोडल्या. सर्फराजचा अडथळा जसवालने दूर केला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी हिमाचलच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
सूर्यकुमार यादव डागरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७५ चेंडूत १५ चौकारासह ९१ धावांची खेळी केली. मुंबईची अवस्था ३०.४ षटकात ५ बाद १४८ अशी झाली होती. तेव्हा आदित्य तारेने शार्दुलसोबत जोडी जमवत आक्रमक फलंदाजी केली. आदित्य ९८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ८३ धावांवर बाद झाला. तर शार्दुलने ५७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारासह ९२ धावा तडकावल्या. यापैकी ६० धावा या त्याने चौकार (६) व षटकार (६) खेचून अवघ्या १२ चेंडूंत केल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईला ९ बाद ३२१ धावांचा डोंगर उभारता आला.
हेही वाचा - भारताचा माजी क्रिकेटपटू कोरोनाच्या कचाट्यात
हेही वाचा - ''तू तुझं काम कर'', समाचोलकावर भडकला डेल स्टेन!